मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा महायुतीत सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे. शरद पवार यांना अजूनही वेळ गेली नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावे. जर ते आधीच महायुतीत सामील झाले असते, तर आज ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.
दरम्यान रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास आमचा विरोध आधीही होता आणि आजही आहे. लोकसभेला भाजपने त्यांना सोबत घेतले होते, पण त्याचा एनडीएला काहीही फायदा झाला नाही. सांगलीतील जत दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी नेते आहेत. देशाच्या राजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पक्षातील बहुतांश आमदार सत्तेत येण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे त्यांनी देखील मोदींसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा. जर त्यांनी वेळेत असा निर्णय घेतला असता, तर आज ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले असते.
रामदास आठवले म्हणाले की, देशाच्या हितासाठी आणि विकासाच्या दृष्टीने शरद पवार यांनी आता तरी निर्णय घ्यावा. मोदी यांच्यासोबत आले, तर त्यांच्या अनुभवाचा उपयोग देशासाठी होईल. आमच्यासह त्यांच्या पक्षातील अनेकांचेही हेच मत आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी बोलताना रामदास आठवले म्हणाले होते की, आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. मला एकट्याला मंत्रिपद मिळाले असले तरी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेचा सहभाग मिळायला हवा. शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडी बरोबर असताना आमचे 6 ते 7 जण विधान परिषदेवर होते, 3 ते 4 मंत्री देखील झाले होते. त्यामध्ये मी मंत्री झालो, शेगावकर मंत्री झाले होते, दयानंद म्हस्के मंत्री झाले होते, मुंबईत आमचा महापौर झाला होता. पुण्यात देखील आमचा उपमहापौर झाला होता. त्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. मात्र, आता महायुतीच्या काळात आरपीआयला सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती असल्याचे रामदास आठवले म्हणाले.


