पालकमंत्र्यांच्या हस्ते संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे भूमिपुजन
धरणगाव प्रतिनिधी : वारकरी तत्वज्ञान हे सत्य, सदाचार आणि प्रबोधनाच्या मजबूत पायावर उभे आहे. आज खर्या अर्थाने समाजाला याच दिशादर्शक ठरणार्या प्रबोधनाची गरज असून ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे काम होईल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. संस्थेच्या कार्यालयाच्या भूमिपुजन प्रसंगी बोलतांना ना.गुलाबराव पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम महत्वाचे असून यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली. वारकरी संप्रदायाशी आपली पहिल्यापासून नाळ जुडलेली असून या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगाव येथील बालाजी नगरातल्या साखर विहिरीजवळ संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे भूमीपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर हभप माधवानंद सरस्वती, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, प्रा. सी. एस. पाटील, प्रा. बी.एन. चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सुरेशनाना चौधरी, डी. आर. पाटील, आर.बी. पाटील, हभप सदाशीव महाराज, माळी समाज उपाध्यक्ष निंबाजी महाजन, विलास महाजन, विजय महाजन, भगवान महाजन, हिरालाल महाजन यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरात भगव्या पताका लावण्यात आल्याने अतिशय प्रसन्न वातावरण निर्मित झाले होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रूख्मीणीसह सर्व संतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी कुदळ मारून व विधिवत पूजा करून संस्थेच्या नियोजीत कार्यालयाचे भूमिपुजन केले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा समाजातील सदवर्तनाला प्राधान्य देतो. यामुळे समाजाला नवीन दिशा मिळते. या विचारांच्या प्रचार-प्रसाराचे काम होणे ही काळाची गरज आहे. यासाठी संत ज्ञानाई बहुउद्देशीय संस्थेसारख्या खरोखर काम करणार्या संस्थांना बळकटी मिळणे देखील आवश्यक आहे. आज समाजात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होत असतांन, वारकरी संप्रदायाचा विचार हाच समाजाला खरी दिशा देणारा ठरू शकतो असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील यांनी केले. तर बाल प्रशिक्षणार्थी किर्तनकारांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.