पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. यादरम्यान पूल कोसळल्याने 25 ते 30 पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, रेस्क्यू व्हॅन, फायर टेंडर बोट, एनडीआरएफ पथक आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.
मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन यासंदर्भात लक्ष घालून योग्य ती कारवाई निश्चितपणे करेल. स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासनासह अन्य शासकीय विभाग त्याठिकाणी निश्चित मदत करतील. मलाही या संदर्भात संपूर्ण माहिती नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली. पूल कोसळला आणि त्यात सहा जणांचे दु:खद निधन झाले आणि काही लोक वाहून गेली, अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. यासंदर्भात मी अधिक माहिती घेऊन त्याअनुशंगाने जे काही करता येईल, ते केले जाईल. जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे.