भुसावळ : प्रतिनिधी
नगरपालिकेच्या बालवाडी परिसरात बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शहरातील आगाखान वाडा, शिवाजी नगर येथे एका युवकाला मारहाण करण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी युवकाच्या घरात घुसून कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करत तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गुलाम मोहम्मद शेख बिस्मिल्ला (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. ११ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते घराजवळील नगरपालिकेच्या बालवाडीसमोर बसले होते. त्यावेळी अहमद इब्राहीम कुरेशी, सुलताना बी अहमद कुरेशी आणि साहील मुशीर शेख हे तेथे आले आणि वाद घातला. याला उत्तर दिल्यावर तिघांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर गुलाम मोहम्मद शेख बिस्मिल्ला हा घरी पळून गेला. रात्री १०.१५ वाजता संबंधित आरोपी व त्यांच्यासोबत आलेल्या गुड्डी शेख मुशीर, नसिम शेख सलीम आणि शमा बी हफीज यांनी युवकाच्या घरात घुसून काका गुलामदस्तगीर शेख रोशन यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने संबंधितांना ट्रामा केअर, भुसावळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर १३ जून रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक तडवी पुढील तपास करत आहेत.