पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना पुण्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले असून या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात घडली. बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली सोनी (वय 29) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच या अपघातात जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51) यास ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड येथील गंगाधम या अत्यंत रहदारीच्या मार्गावरून जगदीश पन्नालाल सोनी आणि दिपली सोनी हे दोघे दुचाकीवरून जात होते. गंगाधाम चौकात आल्यानंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले. या वेळी महिलेच्या अंगावरून ट्रकचा चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर जगदीश सोनी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, गंगाधाम चौकात नेहमीच अपघात होत असतात. अपघात झाला की काही काळासाठी जड वाहनांची वाहतूक थांबवली जाते. तसेच या चौकाकडून जाणाऱ्या बिबवेवाडी कोंढवा रस्त्याची अवस्था देखील वाईट आहे. महापालिकेने ‘आई माता मंदिर’ आणि गंगाधाम चौक दरम्यानच्या उतारात बदल करण्याची योजना जाहीर केली आहे. हा उतार कमी करून स्पीड बंप आणि रॅम्बल स्ट्रिप्स बसवले जात आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटविली गेली पाहिजेत. या रस्त्यावर दिवसा जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.