मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील भाजपचे मंत्री व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता धाराशिव येथे आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे उपस्थित राहिले होते. यावेळी नितेश राणे यांनी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय, हे लक्षात ठेवा, अशी धमकीच घटक पक्षातील नेत्यांना दिली होती.
नितेश राणे यांच्यामुळे सत्ताधारी गटात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल शिंदे गटाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर, ‘आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?’, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता.
त्यानंतर ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर्स झळकताना दिसले. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर एक भलामोठा बॅनर लावला आहे.
‘मी तुषार दिलीप रसाळ… दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता. हा बॅनर लावून ठाकरे गटाने राणे पिता-पुत्रांविरोधात एकप्रकारे दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता यावर नारायण राणे किंवा नितेश राणे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व प्रकारामुळे महायुतीतील इतर पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी याबाबत नितेश राणे यांना चांगलाच सुनावलं असल्याची माहिती मिळत आहे. कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. यासंदर्भात मी संबंधीत मंत्र्यांशी चर्चा केली असून माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असे मंत्र्यांनी मला सांगितले आहे. मात्र, राजकारणामध्ये तुमच्या मनात काहीही असले तरी, अशा वाक्यांचा अर्थ समाजात कसा जातो, ते अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे यापुढे नेत्यांनी असे बोलणे अपेक्षित नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


