जळगाव : प्रतिनिधी
वाढदिवसाच्या दिवशी नवीन गॉगल घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गॉगल चोरल्याच्या संशयावरून गोलाणी मार्केटमध्ये बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ४:०० वाजता घडली. या प्रकारामुळे मार्केटमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन दुकाने बंद करण्यात आली होती.
सविस्तर वृत्त असे कि, चौघुले प्लॉटमधील एका तरुणाचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास तो गोलाणी मार्केटमधील एका दुकानात गॉगल घेण्यासाठी गेला होता. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर दुकानदाराने आपल्या इतर मित्रांना बोलावून घेत त्या तरुणाला बेदम मारहाण केली. ही हाणामारी सुरू झाल्यामुळे मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मार्केटमध्ये पळापळ सुरू झाली. या घटनेमुळे मार्केटमध्ये मोठी गर्दी जमली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ गोलाणी मार्केटमध्ये दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. वाढता वाद पाहून काही दकानदारांनी आपली दकाने बंद करून घेतली होती.


