किल्ले रायगड : वृत्तसंस्था
साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्कालीन राजवटीमध्ये असलेल्या परकीय लोकांना पातशाहींना येथून घालवले. त्यानंतर सार्वभौम साम्राज्याची निर्मिती करून स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला. हा दिवस आज सर्वांसाठी पवित्र आहे. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असला तरी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व ओळखून शासनाने हा दिन राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावा, अशी मागणी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (दि.६) केली.
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित लाखो शिवभक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर तारखेनुसार आज (दि. ६) अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्फत आयोजित करण्यात आला होता. गुरूवारपासून (दि. ५) किल्ले रायगडावर विविध सांस्कृतिक शाहिरी तसेच मैदानी खेळाचे प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. आज सकाळी सात वाजल्यापासून किल्ले रायगडावर सुरू झालेल्या कार्यक्रमांचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर सुवर्णभिषेक करून संभाजी राजे छत्रपती व युवराज शहाजीराजे यांच्या मार्फत करण्यात आला.
याप्रसंगी राजदरबारात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस आयुक्त दराडे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदीसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले की, किल्ले रायगडावर साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेला राज्याभिषेक सोहळा हा क्रांतिकारी दिवस होता. शहाजीराजांची संकल्पना राजमाता जिजाऊ माँ साहेबांनी छत्रपतींच्या माध्यमातून पूर्णत्वास आणली. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. आज देशाला स्वातंत्र्य प्राप्त असले, तरी त्याप्रमाणे जगता येत नसल्याची खंत व्यक्त करून जातिवाद, धर्मांधता, महिलांच्या समस्या यामुळे सुखाने जगणे अशक्य झाले आहे.
राजांच्या विचाराचे आत्मचिंतन करावयाचे असेल, तर लहान पिढीमध्ये त्यांचे विचार रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये छत्रपतींच्या कार्याचा गौरव व्हावा, असे विचार त्यांनी मांडले. पाठ्य पुस्तकांच्या माध्यमातून छत्रपतींचे कार्य मुलांपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. किल्ले रायगड वर गेली दोन दिवस शिवमय वातावरण निर्माण झाले होते. ही ऊर्जा शिवरायांचे विचार रुजवणारी व पुढे नेणारी आहे. राज्यातील नव्हे, तर शेजारील राज्यातील सुद्धा शिवभक्त या ठिकाणी येत नतमस्तक होत आहेत.


