चाळीसगाव : प्रतिनिधी
मेहुणबारे येथून जवळच असलेल्या शिदवाडी येथे शेतीच्या वादातून सख्ख्या काकांच्या त्रासाला कंटाळून ४१ वर्षीय पुतण्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. चरणसिंग जाधव (राजपूत) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकून आपले जीवन संपवले. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. चरणसिंगचे भाऊ चेतन जाधव (राजपूत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जामदा शिवारातील शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका व त्यांची मुले यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. चरणसिंग जाधव याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून दिल्या जात होत्या. शेतीचा न्यायालयातून निकाल लागल्यानंतर दोन्ही काकांची नावे सातबारा उताऱ्यावर लागली. त्यांनी चरणसिंगला शेतात येण्यास मनाई केली. मंगळवारी चेतन जाधव यांना चरणसिंगचा फोन आला की, दोन्ही काका व त्यांची मुले त्रास देत देतात. माझे ऐकत नसल्याने कंटाळून आपण आत्महत्या केल्याचे सांगितले.
रात्री दहाला चरणसिंगने काका व त्यांच्या मुलांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व्हॉटस्अॅपवर टाकली. हे कळताच चेतन जाधव व त्याच्या मित्रांनी जामदा शिवारात चरणसिंगचा शोध घेतला असता शेताच्या बांधावरील भोकरच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात चिठ्ठीही मिळून आली. दरम्यान, शेतीच्या वादातून त्रासाला कंटाळून चरणसिंग जाधव याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊ चेतन जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून काका वजेसिंग जाधव, शांताराम जाधव, प्रतापसिंग जाधव, जगदीश जाधव, किरण पाटील (सर्व शिदवाडी, ता. चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने जाऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक सुहास आव्हाड तपास करीत आहेत. दरम्यान, सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


