अमळनेर : प्रतिनिधी
विजेच्या तारांचे काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील मजुरांनी ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप व पहारने मारून गंभीर जखमी केल्याची घटना २९ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पातोंडा येथे वि. का. सोसायटीच्या गोदामात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे राजेश शामसिंग प्रजापती (खापरखेडा, ता. पिपरिया, मध्यप्रदेश) याने विद्युत वाहिनी टाकण्याचे काम घेतले असून त्याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा कामासाठी मजूर आणत असतो. २९ रोजी तो बिजाधना छिंदवाडा येथून मजूर घेऊन पातोंडा येथे पोहचला. २९ रोजी कैलास मजुरांसह पातोंडा येथील वि. का. सोसायटीच्या गोदामात झोपले होते. रात्री सलीम उर्फ संदीप धुर्वे, गोपाळ धुर्वे, साहुलाल धुर्वे, पंकज सेलू उमरावसिंग, शिवम फुलसिंग यांनी कैलासला उठवून आताच्या आता ४० हजार रुपये दे, असे सांगत त्याच्याशी भांडू लागले. कैलासने त्यांना आता पैसे नाही. सकाळी पैसे देतो, असे सांगितले असता चौघांनी कैलासला लोखंडी पाईप आणि पहारने मारहाण केली. त्यात कैलास बेशुद्ध झाला. त्याची प्रकृती गंभीर असून इंदोर येथे हलवण्यात आले आहे.