यावल : प्रतिनिधी
शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबाने साखरपुड्याचे निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला व महिलेचा विनयभंग करीत पाच जणांना मारहाण केली. यातील एक जण हा गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी मुसा मजीद पटेल, आरिफ ऊर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल, अनिसा जावेद पटेल व यास्मिन जावेद पटेल यांनी हातात लाकडी लाठ्या-काठ्यांनी सदर कुटुंबीयांच्या घरात बळजबरीने घुसून डोक्यावर वार करीत जबर मारहाण केली. या हाणामारीत महिला व पुरुष असे पाच जण जखमी झाले. तर एक ४३ वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला. त्यास प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गंभीर जखमी ४३ वर्षीय इसमाच्या शालकाने दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीसह विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वसीम तड़ती करीत आहेत.