जळगाव : प्रतिनिधी
मित्राला समजविण्यास सांगितल्याचा राग आल्याने देविदास एकनाथ अस्वार (वय ५०, रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव) यांना दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना दि. २ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.बो. येथील हॉटेल धनश्रीजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो येथे देविदास अस्वार हे वास्तव्यास असून ते वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. दि. २ रोजी दुपारच्या सुमारास ते गावातील हॉटेल धनश्रीच्या बाजूला बसलेले होते. यावेळी कौतीक पांडू खलसे हा त्याच्या मित्रांसह त्याठिकाणी आला. यावेळी देवीदास अस्वार यांनी कौतीक खलसे याला त्याच्या मित्राला समजविण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने कौतिक खलसे याने अस्वार यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला आणि काही वेळात त्याचा भाऊ सचिन खलसे यांना घेवून आला. त्यांनी अस्वार यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कौतीक खलसे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड देविदास अस्वार यांच्या डोळ्यावर, कमरेवर आणि पाठीवर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, अस्वार यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित कौतिक पांडू खलसे व सचिन ज्ञानेश्वर खलसे (दोघ रा. शिरसोली प्र.बो. ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ अधिकार पाटील करीत आहे.



