जळगाव : प्रतिनिधी
मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी बोटातील अंगठी शंभराच्या नोटेमध्ये गुंडाळून ठेवण्याचे सांगून दोन जणांनी सुरेश पंढरीनाथ भोळे (वय ७२, रा. माऊली नगर) यांची अंगठी लांबविली. ही घटना १ जून रोजी घाणेकर चौकात घडली. या प्रकरणी दोन अनोळखींविरुद्ध शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश भोळे हे वृद्ध घाणेकर चौकामध्ये एका केळी विक्रीच्या हातगाडीजवळ उभे होते. त्यावेळी एकजण त्यांच्याजवळ आला व आश्रमाचा पत्ता विचारला. काही वेळाने दुसरा एक इसम आला व तोही वृद्धाशी बोलू लागला. पहिल्या व्यक्तीने मी देवमाणूस आहे असे सांगत वृद्धाला हातात दगड ठेवण्यास सांगितले व तो तेथून मंदिराजवळ निघून गेला.
दुसरी व्यक्ती वृद्धास मंदिराजवळ घेऊन गेली व तेथे उभ्या असलेल्या देवमाणूस म्हणवून घेणाऱ्याने मूठ उघडण्यास सांगितली असता दगडाचा रुद्राक्ष झाल्याचे आढळले. नंतर वृद्धास त्यांच्या बोटातील अंगठी शंभराच्या नोटेमध्ये गुंडाळून ठेवण्यास सांगितले. ती पुडी वृद्धाच्या पिशवीत ठेवल्याची बतावणी केली. अंगठीची पुडी वृद्धाच्या पिशवीत ठेवल्याचे भासवून जाण्यास सांगितले व जाताना मागे वळून बघू नका अन्यथा फायदा होणार नाही, असे सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर वृद्धाने पिशवीत पुडी पाहिली असता पुडी व अंगठीही नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मागे वळून पाहिले असता दोघेही जण गायब होते. या प्रकरणी सुरेश भोळे यांनी शनी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.



