रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील विवरे येथील ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील दोन ट्रक्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही चालकांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात २ रोजी मध्यरात्रीनंतर घडला.
सविस्तर वृत्त असे कि, मुंबईकडून बऱ्हाणपूरकडे जात असलेला ट्रक (एमएच ०४ / जेके ९६१२) आणि रावेरकडून सावद्याकडे जात असलेल्या ट्रकची (आरजे १७/ जीबी २०८३) समोरासमोर धडक झाली. यामुळे एक ट्रक उलटला. परिणामी, बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातातील चालकांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत, तसेच रस्त्यात उलटलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान उचलून बाजूला करण्यात आला आहे. रस्त्याला साइडपट्टया खोल असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून, या आठवड्यातील ही चौथी घटना आहे, तरीही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. साइडपट्टया व्यवस्थित कराव्या, अशी मागणी होत आहे