जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सुरु असतांना आता जळगाव-अकोला राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले, तरीही स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावहून अकोल्याकडे निघालेली ट्रॅव्हल्स बस ट्रकला जोरदार धडकली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.