अमळनेर : प्रतिनिधी
तापी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बुडाली. ही घटना निम ता. अमळनेर येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. यापैकी एकाचा मृतदेह आढळला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील निम येथील मयूर ऊर्फ हरीश बाळू पाटील (१२) आणि चेतन धनराज पवार (९) हे दोघे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत परत ते परतले नाहीत, म्हणून शोधाशोध सुरू झाली त्यात चेतनला पोहता येत नव्हते. घटना समजताच मारवाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जिभाऊ पाटील, हेकॉ. संजय पाटील, आगवणे, फिरोज बागवान हे घटनास्थळी पोहचले. रात्री ८ वाजेच्या सुमारास चेतन याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर रात्री उशिरापर्यंत मयूरचा शोध सुरू होता.