जामनेर : प्रतिनिधी
भुसावळहून पुण्याकडे जाणारी खासगी बस उलटून ८ ते १० प्रवासी जखमी झाले. ही घटना गंगापुरी ते गारखेडे (ता. जामनेर) या गावादरम्यान रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. जखमींमध्ये तीन-चार बालकांचाही समावेश आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, दुसरीकडे बसचालक व वाहकात वाद झाला, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचल्या. बेबाबाई घाडे (७५), साहील घाडे (८, दोन्ही रा. खिरोदा), ललिता इंगळे (४०), दिशा इंगळे (८, दोन्ही रा. बऱ्हाणपूर), योगेश चौधरी (३४) आणि रणजित राजपूत (३०, दोन्ही रा. भुसावळ) या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. प्रवीण पाटील व परिचारिकांनी जखमींवर उपचार केले. या बसमधील अन्य १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अन्य प्रवाशांनी भुसावळला परत जात असल्याचे सांगितल्याने रुग्णवाहिकेतून भुसावळात पोहचविण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, रुग्णवाहिका चालक जालमसिंग राजपूत, गणेश चौधरी, अतिष झाल्टे, रवींद्र झाल्टे यांनी जखमींना रुग्णालयात आणण्यासाठी अपघात होताच बसचालक तिथून पसार झाला. या अपघातात बहऱ्हाणपूर येथील तीन ते चार परिवारातील सदस्यही किरकोळ जखमी झाले आहेत तर काहींना मुकामार लागला आहे. त्यांची जामनेरपुरा भागात राहण्याची व्यवस्था केली आहे.



