जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महामार्गार नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना आज महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव – धुळे महामार्गावरील शिवकॉलनी चौकात १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात धरणगाव तहसील कार्यालयात शिपायाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हि घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये एकच संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिव कॉलनीजवळून जाणाऱ्या महामार्गार आज दि.१ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विशाल रमेश सोनार (वय-४४) हे रस्ता ओलांडत असताना खोटेनगरकडून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात त्यांच्या चेंदामेंदा झाला. घटनास्थळी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पथक दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, वाहन चालकाने घटनास्थळाहून पळ काढला आहे.