यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव येथील मयुरी पेट्रोल पंपासमोरून सायकलव्दारे २२ वर्षीय तरुण घरी जात असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर किनगावातील मयुरी पेट्रोल पंपावर गणेश भास्कर धनगर (वय २२) हा तरुण सायकल घेऊन घरी जात होता. दरम्यान, त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गणेश धनगर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात भास्कर धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.
दरम्यान, या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे फुटेज यावल पोलिसांना देण्यात आले आहे. त्यानुसार यावल पोलिसांनी पुढील तपासाची दिशा ठरवल्याचे पो.उ.नि. सुनील मोरे यांनी सांगितले. तर लवकरच हे वाहन शोधून चालकास ताब्यात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.