चोपडा : प्रतिनिधी
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली. त्यांच्याजवळील मिरची पूड व इतर साहित्य असा सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर हातेड बुद्रूक (ता. चोपडा) गावानजीक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू चक्कर चव्हाण (२५), यशवंत निराधार पवार (४२), धर्मा चिमन भोसले (४०) आणि भरत निराधार पवार (३८ सर्व रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. मंगळवारी रात्री १२:३५ वा.चे सुमारास हातेड बुद्रूक (ता. चोपडा) गावानजीक एका पेट्रोलपंपाजवळ चोपडा ते गलंगी रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोन दुचाकीवर चार जण फिरत होते. गस्तीवरील पोलिस पथकाने त्यांना हटकले आणि तपासणी केली असता त्यांच्याकडे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले. तसेच दुचाकी, मोबाइल असा सर्व मिळून तीन लाख तेवीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पो. कॉ. गजानन मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांत वरील चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.