जळगाव : प्रतिनिधी
पोलिस असल्याची बतावणी करीत दुचाकीस्वारांनी संजय भगीरथ सोमाणी (वय ५९, रा. सोमाणी गल्ली, पिंप्राळा) यांच्याजवळील सोन्याची चेन व अंगठी लांबविली. ही घटना दि. २७ मे रोजी बजरंग बोगद्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली. जिल्हापेठ पोलिसात दोन अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय सोमाणी हे दुचाकीने घरी जात असताना पोलिसांचा गणवेश घातलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले. त्यानंतर सोमाणी यांनी त्यांना वाहन परवाना दाखविला. त्यातील एकाने पंजाब व उत्तर प्रदेश येथून काही लोक आले आहेत, तुमच्या हातातील अंगठी व सोन्याची चेन काढून ठेवा, असे सांगत दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. चेन व अंगठी रुमालात गुंडाळल्यानंतर सोमाणी यांनी तो रुमाल खिशात ठेवून निघून गेले. काही वेळाने त्यांनी रुमालात पाहिले असता त्यात दोन दगड निघाले. या प्रकरणी सोमाणी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.