फैजपूर : प्रतिनिधी
आमोदा ते पिंपरूळ फाटा दरम्यान बुधवारी सकाळी तीन वाहनांचा अपघात होऊन त्यात एका वाहनातील केळी वाहतूक करणारे जवळपास १५ मजूर जखमी झाले. ही घटना सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा गावाजवळील या महिन्यातील अपघाताची ही तिसरी घटना आहे. शनिवारी रात्री याच रस्त्यावर इंदोरकडे जाणारी ट्रॅव्हल उलटली होती. त्यातही ५० प्रवासी होते, तर पंधरा दिवसांपूर्वी दोन रिक्षांच्या अपघातात विद्यार्थिनी ठार झाली होती. मोर नदीच्या पुढे मिनी ट्रक व दोन ट्रक यांच्यात अपघात झाला. त्यामुळे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. मोर नदीच्या पुलाजवळ असलेल्या वळणावर भुसावळकडून येणारा मालवाहू ट्रक हा दुसऱ्या मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करीत बाजूच्या ट्रकला कट लागला, तसेच फैजपूरकडून येणाऱ्या मिनी ट्रकला धडक बसल्याने तो झाडावर जाऊन आदळला. यात मिनी ट्रकचा चालक व त्यातील मजून जखमी झाले. मिनी ट्रक झाडाला धडकून तेथेच थांबली, अन्यथा जवळच असलेल्या खोल खड्यात जाऊन अनर्थ घडला असता. बुधवारी फैजपूर येथील बकरी बाजारामुळे फैजपूर ते यावल रस्त्यावरील वाहतूक आमोदयाकडून वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळसुद्धा या रस्त्यावर होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व वाहतूक सुरळीत केली.