धरणगाव : प्रतिनिधी
शेतात काम करीत असतांना पाणी पिवून येतो असे सांगून गेलेल्या गिरीश सुकदेव माळी (वय ३५, रा. रामलीला चौक) या तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास धरणगाव शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील रामलीला चौकात राहणारे गिरीश माळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचे धरणगाव शिवारात शेत असून मंगळवारी सकाळच्या सुमारास ते शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. भेंडी तोड असतांना गिरीश माळी हे सोबत काम करणाऱ्यांना मी पाणी पिवून येतो असे सांगून विहरीजवळ गेले. परंतू बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने त्यांचा भाऊ स्वप्निल माळी हा त्यांना बघण्यासाठी विहरीजवळ आला. यावेळी गिरीश माळी या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांनी लागलीच खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.