जळगाव : प्रतिनिधी
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीसोबत हॉटेलमध्ये फोटो आणि व्हिडीओ काढले. त्या फोटोंसह व्हीडीओ आणि तरुणीसोबत झालेली चॅटींग तरुणीच्या आई वडीलांना दाखविण्याची भीती दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही घटना दि. २६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बोरजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात २३ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये या तरुणीचे विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे या तरुणासोबत इन्सटाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर तरुणाने त्या तरुणीला शहरातील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलाविले. त्याठिकाणी दोघांची भेट झाल्यानंतर तरुणाने तरुणीसोबत हॉटेलमध्ये फोटो काढले. ते फोटो आणि तरुणीसोबत झालेली चॅटींग तिच्या कुटुंबियांना दाखविण्याची धमकी देत त्या तरुणाने तरुणीसोबत अजिंठा चौफुली परिसरातील एका हॉटेलमध्ये अत्याचार केला.
तरुणीसोबत अत्याचार करतांनाचा देखील त्या संशयित विश्वजीत सिसोदे याने व्हिडीओ काढला. तसेच तो व्हीडीओ तरुणीच्या वडीलांसह तिच्या नातेवाईकांना पाठविण्याची देखील तरुणाकडून धमकी दिली जात होती. त्यानंतर संशतियाने तरुणीच्या वडीलांना देखील सोशल मीडियावर जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. संशयिताकडून वारंवार जीवेठार मारण्यासह व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी मिळत असल्यामुळे तरुणीने सोमवार दि. २६ रोजी एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन संशयित विश्वजीत विठ्ठलसिंग सिसोदे (वय २७, रा. बोरजवळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहे.