गेल्या काही वर्षापासून महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मानल्या जातात. या गोळ्या हार्मोन्सच्या साहाय्याने अंडोत्सर्ग थांबवतात व गर्भधारणा होण्याची शक्यता कमी करतात. मात्र, याचे फायदे जितके महत्त्वाचे आहेत, तितकाच धोका काही विशिष्ट परिस्थितीत होऊ शकतो. त्यामुळे या गोळ्या घेण्याआधी योग्य माहिती आणि वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो
नवीन संशोधनानुसार, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये असलेले एस्ट्रोजेन हार्मोन महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात. विशेषतः ज्या महिलांना आधीपासूनच उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय किंवा वंशानुगत हृदयरोगाचा इतिहास आहे, त्यांच्यासाठी ही गोळ्या धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, बाजारात उपलब्ध असलेल्या काही गर्भनिरोधक गोळ्यांमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि रक्तातील गाठी तयार होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. हे स्ट्रोक आणि हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे महिलांनी या गोळ्यांचा वापर करताना सतर्क राहणं गरजेचं आहे.
गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे:
- गर्भधारणेचा प्रभावी प्रतिबंध (99% प्रभावी)
- मासिक पाळीत नियमितपणा व कमी वेदना
- अति रक्तस्त्राव व अॅनिमिया कमी होण्यास मदत
- पिंपल्स व त्वचाविकार कमी होण्यास फायदेशीर
- काही प्रकारचे गर्भाशय व डिंबग्रंथि कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो
गर्भनिरोधक गोळ्यांचे संभाव्य दुष्परिणाम:
- डोकेदुखी, मळमळ, स्तनांमध्ये जडपणा
- काही महिलांमध्ये वजन वाढ होणे
- मूड स्विंग्स व मानसिक अस्वस्थता
- दीर्घकालीन वापरामुळे रक्तातील गाठी होण्याचा धोका
- उच्च रक्तदाब, हृदयरोग व स्ट्रोकचा धोका काही प्रकरणांत वाढतो
डॉक्टरांचा सल्ला घेणे का आवश्यक आहे?
ज्यांना उच्च रक्तदाब, धूम्रपानाची सवय, वंशानुगत हृदयविकार असे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत. गर्भनिरोधकाचा योग्य प्रकार, डोस आणि कालावधी हे वैयक्तिक आरोग्याच्या पार्श्वभूमीवर ठरवणे गरजेचे आहे.