जळगाव : प्रतिनिधी
इच्छादेवी चौक परिसरात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, प्रेम धीरज ठाकूर (वय २०, रा. शिंदे नगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (२६ मे) पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शिंदे नगर येथे आपल्या कुटुंबासह राहणारा प्रेम ठाकूर हा टुर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तो शिंदे नगरातून अजिंठा चौकाकडे दुचाकीने जात होता. याचवेळी ईच्छादेवी चौक परिसरात एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, प्रेम ठाकूरचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, याच रस्त्यावरुन जात असलेल्या विठ्ठल पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. प्रेमच्या कुटुंबात आई, वडिल आणि एक भाऊ आहे.



