चोपडा : प्रतिनिधी
धानोरा -चोपडा महामार्गावर २० दिवसांपूर्वी कोसळलेल्या भल्या मोठ्या वृक्षावर दुचाकी धडकून सुरेश पीतांबर महाजन (६२) या धानोरा येथील निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. मयत शिक्षक हे राज्यस्तरीय खो-खो पंच होते.
सविस्तर वृत्त असे कि, ६ मे रोजी धानोरा परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष कोसळले. अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर धानोराहून चिंचोलीकडे जाताना गावाजवळच भला मोठा वृक्ष कोसळला आहे. हा वृक्ष अनेक वाहनांना त्याचा अडथळा ठरतो आहे. मात्र, तरीही सा. बां. विभागाने दुर्लक्ष केले आहे. अखेर याठिकाणी दुचाकीला अपघात होऊन त्यात निवृत्त शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे
गेल्या २० दिवसांपासून हा वृक्ष तसाच पडून आहे. याच वृक्षामुळे शनिवारी रात्री १० वाजता चिंचोलीकडून घरी धानोऱ्याकडे येणारे मूळ धानोऱ्याचे रहिवासी व बिडगाव विद्यालयाचे निवृत्त शिक्षक एस. पी. महाजन यांची दुचाकी या वृक्षावर धडकली व अपघात झाला. त्यात त्यांच्या मेंदूला जोरदार मार लागला. त्यांना तत्काळ धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तेथून मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मयत शिक्षक महाजन हे खो-खोचे राज्यस्तरीय पंच, तसेच धानोरा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकही होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, असा परिवार आहे.