एरंडोल : प्रतिनिधी
शहरातील गाढवेगल्ली परिसरात दुचाकी लावण्याच्या कारणावरून ४ ते ५ जणांना जबर मारहाण करण्याची घटना घडली असून, यातील युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमोल कैलास पाटील (३१) याच्यासह कुटुंबातील ४ ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पांडव वाड्यामागे घडली. यात अमोल पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला असून, घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिस उपविभागीय अधिकारी (अमळनेर) विनायक कोते यांनी रात्री एरंडोल पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
दि. २५ मे २०२५ रविवार रोजी अमोल याने त्याची दुचाकी घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावल्याच्या कारणावरून तुकाराम उर्फ अप्पा सीताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील, दीपक उर्फ गोलू नामदेव पाटील, उषाबाई तुकाराम पाटील (गाढवे गल्ली, एरंडोल) यांनी मारहाण केली. रोहित उर्फ बंटी व आशिष उर्फ आशू यांनी अमोल पाटील यास शिवीगाळ करत त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली.
अमोल यास काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर आपटून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भांडण सोडवत असताना सचिन कैलास पाटील, संजय पाटील, दीपाली पाटील, जयेश पाटील यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड हे पुढील तपास करत आहेत