जळगाव : प्रतिनिधी
क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या एकूण ३० उंटांची सावदा पोलिसांनी वेळेत सुटका करून त्यांचे प्राण वाचवले. या उंटांना पुढील उपचारासाठी आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी जळगावनजीकच्या कुसुंबा येथील ‘अहिंसा तीर्थ, रतनलाल सी. बाफना गोशाळा येथे सोपविण्यात आले आहे.
सावदा पोलिसांनी १६ मे २०२५ रोजी केलेल्या कारवाईत २१ उंटांची सुटका केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९६० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दोन मोठ्या गाड्यांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या या उंटांबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. १६ मे रोजी पोलिसांनी १७ नर आणि ४ मादी असे एकूण २१ उंटांची सुटका केली होती. यातील १०-१२ उंट गंभीर जखमी अवस्थेत होते.
२४ मे रोजी पहाटे ३ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या पथकाला एक ट्रक उंट घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. ट्रकला अडवून तपासणी केली असता उंटांच्या पायांना दोराने बांधून अमानुषपणे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या ट्रकमधून आणखी ९ उंटांची सुटका करण्यात आली. गोशाळेचे संचालक सुशीलकुमार बाफना यांनी उंटांसाठी खाद्य, पाणी आणि उपचारांची व्यवस्था केली आहे.