पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका कायम आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज (हलका ते मध्यम स्वरूपाचा) वादळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.