पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक वादग्रस्त विधान करण्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमीच चर्चेत येत असतांना आता शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. रायगडावर 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा नामशेष झाला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे लोटली, पण त्यानंतरही आपण आपले मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचेही जोरदार समर्थन केले.
छत्रपी शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला होता. त्यानुसार दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. पण आता संभाजी भिडे यांनी या सोहळ्यास कडाडून विरोध करत ही परंपरा नामशेष करण्याची मागणी केली आहे. संभाजी भिडे कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, 6 जून रोजी शिवराज्याभिषेक साजरा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. आपण अजूनही 76 वर्षे झाले तरी आपले मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार झाला होता. त्यानुसार तिथीनुसारच त्यांचे स्मरण दिन किंवा जयंती साजरी केली पाहिजे. 6 जूनचा विषय बंद झाला पाहिजे.
वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही किंवा तशी नोंदही नाही. त्यानंतरही त्या कुत्र्याचा पुतळा रायगडावा असावा असा हट्ट का? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी संभाजी भिडे यांना विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढता कामा नये. तो राजकारणाचा विषय करता कामा नये. गोष्ट अशी आहे की, तो कुत्रा नव्हता असे इतिहास संशोधक म्हणतात. ते इतिहास संशोधक काय उंचीचे व काय कुवतीचे आहेत? गलका करून कुणालाही इतिहास संशोधक म्हणायचे आणि तो बोलतो ते खरे मानायचे हे बरोबर नाही. त्यासाठी स्वतंत्र एखादे संशोधन मंडळ नेमून तो निर्णय घेतला पाहिजे. आपण राजकीय लोकांनाच इतिहास संशोधक म्हणतो हे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
संभाजी भिडे यांनी यावेळी पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावरही भाष्य केले. हुंडा मागणे देशाला लागलेला कलंक आहे. ही गोष्ट सगळ्या प्रकारचे बुद्धीबळ, व्यावहारिक बळ वापरून नामशेष केली पाहिजे. पण ते करत असताना राजकारण होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मेपर्यंत हटवण्याचा अल्टीमेटम दिला आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी व केंद्रीय संरक्षित स्मारक असलेल्या दुर्गराज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी आपल्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.