पुणे : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून राज्यातील पुणे येथील अजित पवार गटाचे कार्यकर्ते राजेंद्र पवार यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्म्हत्या प्रकरणी मोठी कारवाई होण्याची मागणी सुरु असतांना वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार धरला जाणारा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे दोघेही गेल्या सात दिवसांपासून मोकाट फिरत होते. त्यांना आता अटक झाली असून ते मागील काही दिवसांपासून तळेगाव परिसरातच असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून हे दोघेही हॉटेलमध्ये जेवण करत असताना या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तब्बल सात दिवस राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते. मात्र, हे दोघे देखील जवळच तळेगाव परिसरात फिरत होते. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली त्यावेळी दोघेही हॉटेलमध्ये मस्त जेवण करत होते. तरीही पोलिसांना इतके दिवस त्यांचा शोध का लागला नाही? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांना आधीच पोलिसांनी अटक केली आहे. मात्र सासरा आणि दीर अजूनही फरार होते. त्यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत ते हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारत असल्याचे समोर आले आहे. या दोघांच्याही सीसीटीव्ही फुटेज मधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (23) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या हत्येनंतर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाला होता. त्याच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने मुलाला घेऊन पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता सासरा आणि दीर देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.