अमळनेर : प्रतिनिधी
बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपये मिळवून देतो, असे सांगत एका दाम्पत्याजवळून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी व्यक्तीने फसवुन पळवून नेल्याची घटना १९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, अशरफबी फकीर मोहम्मद शेख ही मूळची अमळनेर येथील महिला सध्या सुरत येथे राहते. पुतणीच्या लग्नासाठी ती पतीसोबत अमळनेरला आली होती. १९ रोजी ती स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभी असताना एकजण आला व त्यांना म्हणाला की, तुम्हाला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये काढून देतो. कोणाशी तरी फोनवर बोलण्याचे नाटक करून नंतर साडेबारा वाजता रिक्षामध्ये बसवून तहसील कार्यालयाकडे घेऊन गेला. त्याने सांगितले की, अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून घ्या, नाहीतर पैसे मिळणार नाहीत. महिलेने १४ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम सोन्याचे टोंगल, १४ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची पांचाळी, १५ हजार रुपये किमतीचे ४० भार वजनाचे चांदीचे पायातील वाले व १५०० रुपयांचा मोबाइल असे एका पिशवीत काढून ठेवले. फकीय मोहम्मद शेख यांना भामटा तहसील कार्यालयात घेऊन गेला. परत आल्यावर त्याने सांगितले की, काकांचे ४० हजार रुपयांचे काम झाले आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर चला म्हणून सांगितले. महिलेने सोन्या-चांदीचे दागिने पतीजवळ दिले. महिलेला घेऊन तो तहसील कार्यालयात गेला आणि तेथून तिला आधार कार्डची झेरॉक्स काढून आण, म्हणून सांगितले. तोपर्यंत तो फकीर शेख यांच्याकडे आला व अशरफबी यांनी पिशवी मागितली, असे सांगून दागिन्यांची पिशवी घेऊन निघून गेला. परत आल्यावर महिलेला फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीबी पथकाला घटनास्थळापासून ते फसवणूक झाली तिथपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले