मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत, असे ते म्हणाले. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण आत्महत्येचे नव्हे तर हत्येचे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
विजय वडेट्टीवार गुरुवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र हा बोगस बियाण्यांचा अड्डा बनला आहे. यासंबंधी तुम्ही – आम्ही मिळून खाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाला वाचा फोडत आहे. विधानसभेतही आम्ही हा प्रश्न वारंवार लावून धरला आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचे शुद्ध वाण मिळत नाही. याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत. सगळेजण मिळून हा सर्व प्रकार राजरोसपणे करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा असाही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांत पुढे गेला आहे. पुन्हा त्याचा उच्चांक गाठू नये याची काळजी घेण्याची गरज आहे.
सरकारने शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी दिली नाही. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत थातुरमातूर चर्चा झाली. पण कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अवकाळी पाऊसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. पण त्यावरही सरकारने कोणतेही भाष्य केले नाही. या प्रकरणी सरकार गंभीर असल्याचे दिसत नाही. आता बाजारात बोगस बियाणे येत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी कायद्यात दुरुस्ती करून बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर किमान 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करावी. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाऊ नये, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.


