मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. या वर्षभरात करोनाचे एकूण १३२ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १२६ मुंबईतील आहेत. राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात आणखी २६ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत,
राज्यात जानेवारी ते २१ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार २०६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १३२ रुग्णांना करोनाचे निदान झाले आहे. यामध्ये मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक १२६ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ४६ करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात करोनासह श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. अशा सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. राज्यात करोनाचे रुग्ण सध्या तुरळक आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, अशी माहिती आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे.
आशियात वाढत्या कोरोना प्रकरणांमधील बहुतेक प्रकरणं ही सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, असं नवी दिल्लीतील एम्स येथील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. हर्षल साळवे यांनी आयएएनएसला सांगितलं आहे.भारतातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. १९ मे रोजी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या आढाव्यात देशभरात २५७ एक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, मात्र अधिकाऱ्यांनी परिस्थिती ‘नियंत्रणात’ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचे आव्हाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.