मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून अनेक विषयावर ठाकरे गटाचे नेते आक्रमक होत असतांना आता आदित्य ठाकरे देखील आक्रमक होवून थेट इशारा दिला आहे. मुंबईत वरळीमधील आर्थर रोड नाका येथील शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी आणि बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आणि बिल्डरला थेट इशारा दिला आहे. मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे.
अर्थर नाक्यावरील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे शंभर वर्षे जुने आहे. मुंबई महापालिका आणि बिल्डर्समार्फत या मंदिराला नोटीस बजावण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी त्यानंतर मंदिर समितीच्या सदस्यांसोबत या परिसराची पाहणी केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे रहिवाशांचे श्रद्धास्थान आहे. बांधकामात अडथळा ठरत नसतानाही मंदिर समितीला नोटीस देण्यात आली. या मागे नेमका कोणता हेतू आहे? परंतु मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या पालिका आणि बिल्डरची दादागिरी सहन करणार नाही. मंदिराची जागा वाचवण्यासाठी आम्ही समितीसोबत कायम राहू. तसेच मंदिराला कोणी हात लावला तर बिल्डरच्या विक्रीच्या सदनिकांची इमारत बांधू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.