अमळनेर : प्रतिनिधी
येथील रहिवासी व नुकताच साखरपुडा झालेल्या इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे बुडताना वाचविताना यास स्वतःचा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली. इन्साफ आजाद खान (वय २२, अमळनेर) असे मित्राला वाचवताना मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, इन्साफ व मयूर मोहन गांगुर्डे (वय २५, दोन्ही रा. अमळनेर) हे दोघे धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अवधान शिवारातील धरणावर गेले होते. यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून इन्साफने त्याला हात देत बाहेर काढले; मात्र हे करीत असताना इन्साफचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. इन्साफने मित्राला तर पाण्यातून बाहेर काढले परंतु तो स्वतः बुडाला. यावेळी इतरांनी धाव घेत त्यासही पाण्यातून बाहेर काढले. पण तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी सात वादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नेहमी अभ्यासात पुढे असणारा इन्साफ, मैत्री आणि जबाबदारी या मूल्यांमध्येही तितकाच पुढे होता. त्याची निस्वार्थ मैत्री आजच्या समाजाला अनुकरणीय आदर्श देऊन गेली आहे. सर्वार्थाने चांगला असलेल्या आणि चांगले काम करण्यासाठी पुढे झालेल्या इन्साफला नियतीने मात्र इन्साफ न दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.