मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता सर्वोच्च न्यायालयाने आगामी चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पक्ष संघटनात्मक बदल करण्यासाठी अॅड. आंबेडकर हे लातूरमध्ये दाखल झाले होते. त्यांनी लातूरच्या दयानंद सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे लवकरच भाजपमय होतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट सामील होईल असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळे लवकरच शरद पवार देखील भाजपमय होतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तसेच राज्यात जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षच नाही. जे कोणी आहेत त्यांची आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळे कोणत्याच मुद्यावर कोणी प्रश्न उपस्थित करीत नाही, ही आजची स्थिती आहे, असंही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत आहेत. भारत-पाक युद्धामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले. त्यामुळे आगामी काळात शरद पवार हे भाजपमयी झाले तर नवल वाटायला नको असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपा हा पक्ष वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाला आता महाविकास आघाडी नेमका कसा प्रतिसाद देते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे पक्षपातळीवर आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा झाल्यानंतर या निवडणुकीबाबत काय भूमिका पुढे येते हे लवकरच स्पष्ट होईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना सांगितले आहे.