जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नेहमीच गजबजलेल्या टॉवर चौकात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपला हात साफ केला आहे. शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका ५२ वर्षीय महिलेच्या हातातील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पर्समध्ये असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा १४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. विशेष म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणापासून पोलीस स्थानक हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे पोलीस स्थानकाच्या समोरचा चोरट्यांची दादागिरी वाढली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जानकाबाई भगवान पाटील (वय ५२, रा. गुर्जर अळी, चोपडा) या रविवारी सायंकाळी चोपडा येथे जाण्यासाठी टॉवर चौकात बसची वाट पाहत उभ्या होत्या. चोपडा बस आल्यानंतर जानकाबाई बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून घेतली. या पर्समध्ये ४,७०० रुपये किमतीचा सोन्याच्या पंख्या आणि ९ हजार ४५० रुपये किमतीची कानातील सोन्याची बाली असा एकूण सुमारे १४,१५० रुपयांचा ऐवज होता, जो चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी जानकाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे टॉवर चौकातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे