जळगाव : प्रतिनिधी
यावल येथील एका माध्यमिक शिक्षकाला ट्रेडींगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या शिक्षकाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२, रा. यावल) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
शिक्षकाला ३० मार्च रोजी एका व्हॉटसअॅप ग्रुपमधून ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले गेले. सौजन्या गिल नावाच्या महिलेने भारुडे यांना ‘व्हिआयपी ६५’ या व्हॉटसअॅप ग्रुपवर सहभागी करून घेतले. वेगवेगळ्या ट्रेडींग ग्रुपमध्ये सामील करून, ‘मोठा नफा मिळेल’ असे आमिष दाखवण्यात आले. चोरट्यांनी भारुडे यांना सुरुवातीला भरलेले २ लाख रुपये परत केले. ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला की ही गुंतवणूक सुरक्षित आहे. यानंतर, भारुडे यांनी आपल्या वेगवेगळ्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ६२ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने भरले. मात्र, अनेक दिवस उलटूनही पैसे मिळाले नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोमवारी नंदकिशोर भारुडे यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात जाऊन, सौजन्या गिल नावाच्या महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे.