चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव पोलिस खात्याचे ब्रीद असणाऱ्या सद्रक्षणाय खलनिग्रहणायचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे. चाळीसगावला याउलट घडले. पोलिसांनीच खंडणी घेतल्यामुळे वर्दी डागाळली आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनाही हे प्रकरण भोवले आहे. अवघ्या सात महिन्यांत त्यांची उचलबांगडी झाली आहे. त्यांना कंट्रोल रूमला पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील गुन्ह्याचा आलेख गेल्या काही वर्षात वाढला आहे. थेट गोळीबाराच्या घटना घडल्या. टोळीयुद्धाचा भडकादेखील शहरवासीयांनी अनुभवला. पोलिस दलातील सुंदोपसुंदीचे प्रकारही समोर आले आहेत. दरम्यान, खंडणी प्ररकणातील आरोपी पोलिस हवालदार अजय पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. जळगावला पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षात त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांनी दिली.
आ. मंगेश चव्हाण यांनी संगणक क्लास चालक स्वप्नील राखुंडे यांना धीर देत खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश केला. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाविरुद्धच्या प्रकरणाशी संगणक क्लासचालकाचे कनेक्शन जोडून पोलिस हवालदार अजय पाटील याने खंडणी उकळली. संगणक क्लास चालकाने मित्रांकडून पैसे घेऊन पोलिसांना एक लाख २० हजार रुपये दिले. हा सर्व प्रकार संतापजनक आहे.
खंडणीची रक्कम पोलिसाच्या घरात मिळून आली असून यात अजून किती जणांचा सहभाग होता? हेही उजेडात येणे गरजेचे आहे. बनावट अकाउंटवरून बदनामी करणारे शांताबाई प्रकरण सध्या गाजते आहे. यातही खंडणीचेच धागेदोरे हाती लागले आहे. यातील रणजितकुमारे दराडे हा सध्या गजाआड आहे. यातही आमदार चव्हाण यांनी कठोर भूमिका घेतली. यातील अन्य दोघे फरार असून यातील एक पत्रकार आहे.