जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण वाढले असतांना आता धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा लावून कारवाई करत एका ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे. दिनेश वासुदेव साळुंखे (वय ५३), असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार एक शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये पाच लाख रुपये किमतीचे रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाच्या चार लाख रुपयांच्या बिलाचा चेक मिळाल्यानंतर, तक्रारदार दुसऱ्या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी दिनेश साळुंखे यांनी तक्रारदाराकडे पूर्वी दिलेल्या बिलाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजेच ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानुसार, १९ मे रोजी धुळे एसीबीच्या पथकाने पारोळा येथे जाऊन तक्रारदाराची भेट घेतली आणि त्यांची तक्रार नोंदवून घेतली. याच दिवशी पडताळणी केली असता, दिनेश साळुंखे यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली आणि ती अमळनेर येथे दगडी दरवाजासमोर, राजे संभाजी चौकात स्वतः स्वीकारली. लाच घेतल्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले, परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. संशयित आरोपी दिनेश साळुंखे यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळावरून आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपासणी केली जाणार आहे. या सापळा कारवाईसाठी पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी या तपास करीत आहेत.