जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रवींद्रनगर भागातील रहिवासी वल्लभ सुभाषचंद्र अग्रवाल (५१) आणि म्हसावद येथील ओम जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे मालक अशोक रामकरण पोरवाल या दोन कापूस व्यापाऱ्यांची तब्बल १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तराखंडमधील एका वस्त्रोद्योग कंपनीच्या संचालकांसह तिघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी (दि. १८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वल्लभ अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार अग्रवाल यांची उमाळे येथे चिरायू कॉटन इंडस्ट्रीज नावाची जिनिंग फॅक्टरी आहे. ते दलालांमार्फत कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तीन वर्षापूर्वी ‘इंडियन कमोडिटीज डॉट कॉम’चे संचालक दिनेश हेगडे यांच्यामार्फत त्यांची ओळख बीएसटी टेक्सटाइल मिल्सचे संचालक मुकेश त्यागी यांच्याशी झाली. यानंतर, सप्टेंबर २०२४ मध्ये अग्रवाल यांनी एकूण २६ लाख ९८ हजार २८४ रुपयांचा कापूस त्यागी यांच्या कंपनीला पाठवला. मात्र मुदत उलटूनही पैसे न मिळाल्याने अग्रवाल यांनी विचारणा केली असता, टाळाटाळ करण्यात आली. अग्रवाल यांनी ही माहिती त्यांचे मित्र अशोक पोरवाल यांना दिली असता, पोरवाल यांनीही याच कंपनीला १८ जून २०२४ रोजी ३८ लाख ७८ हजार रुपयांचा कापूस पाठवला होता, अशी माहिती समजली, त्यांचीही रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
दरम्यान, मुकेश त्यागी, निखिल त्यागी आणि संगीता त्यागी यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशातील धामनोद पोलिस ठाण्यातही २ कोटी १९ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे अग्रवाल यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. अग्रवाल यांची ९६ लाख ९८ हजार व पोरवाल यांची ३८ लाख ७८ हजार अशी एकूण १ कोटी ३५ लाख ७६ हजार २०४ रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील करत आहेत.