मुंबई: वृत्तसंस्था
राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असतांना दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सर्वांना सावध राहण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
2020 मध्ये आलेल्या कोविड-19 महामारीने जगभरात हजारो लोकांचा बळी घेतला. सध्या पुन्हा एकदा कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिल्पा शिरोडकर यांचा पॉझिटिव्ह अहवाल चिंतेचा विषय ठरला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत प्रकृतीबाबत माहिती दिली. “नमस्ते मित्रांनो, माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कृपया सर्वांनी सुरक्षित राहा आणि मास्क घाला,” असे त्यांनी लिहिले.
या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी पुन्हा कोविडच्या वाढत्या प्रकरणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आश्चर्य व्यक्त करत, “हे भगवान! शिल्पा, काळजी घे. लवकर बरी हो,” असे कमेंट केले. शिल्पा यांनी याबद्दल सोनाक्षीचे आभार मानले. अभिनेत्री इंदिरा कृष्णा यांनीही त्यांना काळजी घेण्याचा सल्ला देत लवकर बरे होण्याची प्रार्थना केली.