सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी सध्या आग लागण्याच्या घटना घडत असतांना आता मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला लागलेल्या आगीने थैमान घातले. या आगीत आतापर्यंत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही 5 ते 6 जण अडकले असावेत, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लगली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘सेंट्रल इंडस्ट्री’मध्ये ही आग भडकली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात साहित्य साठवलेले असल्याने आग पसरली.सोलापूर महानगरपालिका आणि एमआयडीसीमधील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग एवढी मोठी होती की, अक्कलकोट, पंढरपूर, चिंचवड आणि एनटीपीसी येथूनही फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवाव्या लागल्या. आगीच्या झळांपासून बचाव करताना 2 फायरमॅन किरकोळ जखमी झाले आहेत.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात साहित्य मोठ्या प्रमाणावर असून, साईड मार्जिन नसल्यामुळे आत प्रवेश करणे फार कठीण जात आहे. आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध मार्गांद्वारे प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किट किंवा रासायनिक साठ्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.