मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधक असा वाद सुरु झाला असतांना नुकतेच खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदीर येथे पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याशिवाय या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे ही देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबात केलेल्या विधानाचा त्यांचे नाव न घेता टोला लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाबाबत विचारण्यात आले होते. ते म्हणाले, “कथा-कादंबऱ्या वाचणं केव्हाच सोडलं आहे. तसंच आता बालवाड्मय वाचण्याचं माझं वयही राहिलेलं नाही. अशा गोष्टींवर फार गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही, अशी टीका केली होती. तसेच ते कोण आहेत? मोठे नेते आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
संजय राऊत आणि पुस्तक यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, कुणी आणखी काही सांगितलं. या पुस्तकात जी माहिती आहे त्यातून सत्तेचा गैरवापर कसा होतो, त्याच उत्तम लिखाण या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्रसमोर आणलं आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.