चाळीसगाव : प्रतिनिधी
शांताबाई या फेसबुक अकाऊंटवर बदनामी केली व ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी शांताबाई अकाऊंट धारकसह अन्य साथीदारांविरोधात १४ रोजी शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यात शांताबाई फेम रणजितकुमार सुदेशकुमार दराडे याला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. यातील दोघे आरोपी फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणे येथील शिक्षक शेख अजिज शेख बशीर खाटीक यांच्या बाबतीतही शांताबाई या अकाऊंटवर बदनामीकारक पोस्ट केली होती व त्यानंतर आमच्याकडे तुमचे अजून व्हिडिओ असून आम्ही ते अपलोड करू अशी धमकी देऊन त्यांचेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती. त्यानंतर दराडे याने मुराद पटेल यांच्यामार्फत २० हजार व १० हजार रुपये इम्रान शेख शब्बीर यांच्या फोन पे वरून फिर्यादीकडून घेतले होते. शेख अजीज शेख बशीर खाटीक यांच्या फिर्यादीनुसार १४ रोजी शांताबाई अकाऊंटधारक रणजितकुमार सुदेशकुमार दराडे, मुराद पटेल दोघे रा. चाळीसगाव व इम्रान शेख रा. मेहुणबारे यांच्याविरोधात शहर पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.