बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला. या घटनेचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भारताने ज्या प्रकारे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये देखील केले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे. बीडचा परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे. आणि खरंच याला आता अतिशय गंभीरतेने घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली
त्याच्यात सगळे मुले अतिशय छोटी होती. 18 वर्षाच्या आसपासचे होते. जसा आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केला होता तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केला पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवराज हनुमान दिवटे (रा. परळी, जि, बीड) असं अपहरण करून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळीमध्ये तरुणाचे पेट्रोल पंपावरून अपहरण केले. त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली. परळी येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिवराज हा जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरुन परतत होता. त्यावेळी त्याचे अपहरण झाले. यानंतर टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिर परिसरात समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराजला मारहाण केली.
दहशत पसरवण्यासाठी समाधान मुंडेच्या साथीदारांनी या घटनेचा व्हिडीओदेखील चित्रीत केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीड पोलिसांनी समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यामध्ये समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार शिवराज दिवटे याला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत आहेत. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. हे सगळेजण बांबू आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला मारताना दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही समाधान मुंडे आणि त्याचे साथीदार त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


