मुंबई : वृत्तसंस्था
नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी तर जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सावधानगिरीचा इशारा म्हणून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. विविध ठिकाणांवर उद्या वादळी पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उद्या विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याचे (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने म्हटले आहे.
पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शुक्रवारी ( १६ मे) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. तसेच अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली येथे देखील ३८ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले आहे.