मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तुरुंगात लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून जोरदार वादंग सुरु झाले असतांना आज या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. “संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळायचं,” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेप्रमुख राज ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तुरुंगात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी एक तरी फोन करायला पाहिजे होता, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि ‘victim card ‘खेळायचं. तुम्ही काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेल मध्ये नव्हता गेला, आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेला होता.”
खासदार संजय राऊत यांना एका जमीन प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आर्थर रोड येथील तुरुंगात तीन महिने राहावे लागले होते. तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज प्रकाशन आहे. या प्रकाशन सोहोळ्याला ज्येष्ठ पटकथाकार लेखक जावेद अख्तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुस्तकात राऊत म्हणाले आहेत की, राज ठाकरे माझे चांगले मित्र होते, त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते. राजकारण जरी वेगळे झाले तरी संकटकाळात घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कुणीतरी आपल्यासोबत आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्यावरती संकटांचा पहाड कोसळला होता, व्यक्तिशः नव्हे तर कुटुंबावर, तेव्हा एक काडीचाही आधार असतो, कुणीतरी फुंकर मारते ते महत्त्वाचे असते, असेही राऊत म्हणाले.